सकारात्मक सामाजिक बदलासाठी उद्यमशीलतेचे बीज पेरणारे शांतिलाल मुथ्था ज्येष्ठ समाजसेवक म्हणून
ओळखले जातात. अत्यंत नम्र असलेले मुथ्था गेली ३० वर्षे सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करत आहेत.
त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील डोंगरकिन्ही (ता.पाटोदा) या लहानशा गावात झाला. त्यांची घरची आर्थिक
परिस्थती अतिशय बेताची, सहा महिन्यांचे असतानाच आईचे आकस्मित निधन झाले. त्यांचे वडील प्रवरानगर
साखर कारखान्यावर जाऊन, तेथील छोट्या वस्तीमध्ये किराणा दुकान चालवायचे. आईचे निधन झाल्यामुळे
शांतिलाल मुथ्था यांचे ११ वीपर्यंतचे शिक्षण बीड जिल्ह्यातील कडा येथे अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ या
वसतिगृहामध्ये झाले.
वस्तीगृहामध्ये शिक्षण घेत असताना, जैन समाजातील मोठ्या विवाह सोहळ्यामध्ये वसतिगृहातील काही
विद्यार्थ्यांना वाढपी म्हणून बोलाविले जात होते व त्यातून वसतिगृहाला देणगी मिळत होती. अशा प्रकारच्या
मोठ्या लग्नसोहळ्यातील वाढपीचे काम त्यांनी चार वर्षे केले. त्या वेळी जैन समाजातील विवाहप्रसंगी होणारा
अवाढव्य खर्च पाहून त्यांचे मन विचलित होई. त्याच वेळी त्यांनी लग्नातील खर्च कमी करण्यासाठी कार्य
करण्याचा निर्धार केला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे येथे आल्यानंतर, वसतिगृहात प्रवेश घेऊन खाजगी
नोकरी करत १९७६ साली बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, इस्टेट एजंटचा व्यवसाय सुरू केला. त्यातून
जनसंपर्क वाढल्यामुळे त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. ७-८ वर्षे बांधकाम व्यवसाय अतिशय सचोटीने
केल्यानंतर, वयाच्या ३१ व्या वर्षी आयुष्यभर सामाजिक कार्य करण्याचा निर्धार करून ते या व्यवसायातून निवृत्त
झाले. लहानपणापासून विवाहातील अनावश्यक खर्च कमी व्हावा, अशी इच्छा असल्यामुळे, त्यासाठी जनजागृती
आणि कौटुंबिक समस्यांवर कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह, बिना
हुंड्याचे विवाह, मुलींच्या घटत्या संख्येवर जनजागृती इत्यादी कामे वेगाने सुरू केली. सुरुवातीला जैन समाजाचे
२५, ५१ व १०० सामूहिक विवाह आयोजित करून, संपूर्ण महाराष्ट्रात ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ३०००
कि.मी. पदयात्रा केली. त्यानंतर, महाराष्ट्रामध्ये सर्व जाती-धर्मामध्ये वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह
सातत्याने होऊ लागले. १९८५ साली सर्व जाती-धर्माचे ६२५ सामूहिक विवाह पुणे येथील एस.पी. प्रांगणात
आयोजित करण्यात आले. बघता- बघता एका छोट्या कार्याचे रूपांतर देशभरच्या चळवळीमध्ये झाले. १९८५
साली त्यांनी भारतीय जैन संघटनेची स्थापना केली. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन १९९३ च्या लातूर भूकंपात
मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करीत असताना, तेथील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी १,२००
भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी पुणे येथे आणले व भारतीय जैन संघटनेचा वाघोली
शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पातून लातूरची मुले गेल्यानंतर, मेळघाट व ठाणे परिसरातील
आदिवासी विद्यार्थ्यांना या ठिकाणी सातत्याने आणले गेले. जमू-काश्मीर भूकंपातील ५०० विद्यार्थांना
शिक्षणासाठी पुण्यात आणले.
गेल्या तीन वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या ६०० मुला-मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन यशस्वीपणे सुरू आहे.
या विद्यार्थ्यांसाठी या प्रकल्पामध्ये ‘मेंटल हेल्थ’ विभागाची स्थापना करण्यात आली आहे. लातूर भूकंपानंतर
२००१ च्या गुजरात भूकंपामध्ये त्या ठिकाणी चार महिने राहून, ३६८ शाळा बांधून तत्कालीन पंतप्रधान
अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुजरात सरकारला सुपुर्द करण्यात आल्या. या माध्यमातून १ लाख २०
हजार विद्यार्थांची तीन महिन्यांत शाळेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली. २००५ मध्ये आलेल्या
त्सुनामीमध्ये तामिळनाडू व अंदमान-निकोबार येथे मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले. जम्मू-काश्मीरच्या
भूकंपात एका महिन्यात १५ हजार लोकांची राहण्याची व्यवस्था एनडीएमए यांच्याबरोबर करार करून करण्यात
आली. नेपाळ भूकंपात तीन महिने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करण्यात आले. महाराष्ट्राच्या दुष्काळामध्ये
दरवर्षी सातत्याने कार्य केले जात आहे. २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील ११७ तलावातून २० लाख क्युबिक मीटर
गाळ काढून एक उच्चांक प्रस्थापित करण्यात आला. एप्रिल-मे २०१७ मध्ये ‘पानी फाउंडेशन’च्या माध्यमातून
मोठ्या प्रमाणावर श्रमदान करणा-र्या ४०० गावांमध्ये ४९० जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने कठीण काम
करून दिले. सन २००३ मध्ये भारतातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी व मूल्य
शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. यासाठी अधिस्वीकृती, शिक्षक प्रशिक्षण, मुख्याध्यापक प्रशिक्षण,
पालक व इतर घटकांबरोबर संवाद असे वेगवेगळे मोड्युल्स तयार करून, महाराष्ट्र, गोवा, अंदमान- निकोबार,
गुजरात, मध्यप्रदेश, मेघालय या राज्य सरकारबरोबर करार करून, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ठोस काम
करण्याची संधी प्राप्त झाली. या सर्व अनुभवातूनच मूल्य शिक्षणावर आधारित मूल्यवर्धन कार्यक्रमाची निर्मिती
२००९ मध्ये झाली. बीड जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांतील ३५ हजार विद्यार्थ्यांबरोबर या कार्यक्रमाची
अंमलबजावणी सुरू झाली. सात वर्षांत या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या मूल्यमापनातून
विद्यार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडत असलेले दिसून आले.
या सर्व अनुभवावरून २०१५ मध्ये मूल्यवर्धनचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने हा
आराखडा २०१६ पासून ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका केंद्रात सुरू केला आहे. २०१७ मध्ये त्याची व्याप्ती १०७
तालुक्यांतील २० हजार शाळांमधून १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. या कामी शांतिलाल
मुथ्था फाउंडेशन शासनाला विनामूल्य सहकार्य करीत आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम म्हणजे, जिल्हा परिषद
शाळांतील मोठे परिवर्तन ठरणार आहे. महाराष्ट्राबरोबरच गोवा राज्याच्या सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये
मूल्यवर्धन दोन वर्षांपासून सुरू आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून यशस्वी
झालेला हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.